आतापर्यंत कित्येक आव्हानांना सामोरा गेला माणूस...
पण
आजपर्यंत पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न,
अस्तित्वाचा,
आयुष्याचा,
"जगण्याचा...!"

Friday, March 7, 2014

भेळ


चारी बाज़ूंनी हिरवं खात ज़ाणाऱ्या सुरवंटासारखी रेल्वे चाललेली. कर्ज़त पासून लोणावळ्यापर्यंतचा सारा घाटाचा परिसर हिरव्याच्या अनेक छटांनी गच्च भरलेला. रिमझिम पावसात अनेक छोटे मोठे धबधबे येत जात होते. अनेक पाटांचे ओढे आणि पायऱ्यांनी अगदी मायकलॅंजेलोला लाज़वतील असे ओहोळ खळखळत होते. लोकल ट्रेनला कांहीही झालं तरी हे कॅरेक्टर येणं शक्य नाही. याचा अर्थ साऱ्या पॅसेंजर प्रेमानं जोजवलेल्या असतात असा नव्हे, पण एक संथ फ़ील असतो, ग्रॅंजर असतं. मघाशी सुटे नाहीत म्हणून हुकलेली भेळवाली परत आली. मी पाऊस पाण्याशी खेळत, दरी-झरे बघावे म्हणून आगऊ पणाने कासवासारखी मान आत बाहेर करत रेल्वेच्या दाराशी उभा होतो. "मस्सालाऽभ्येल" ह्या धावत्या हाकेवर "ए बाई" अशी हाक मारली आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं. सहसा मी आहो-जाहो शिवाय बोलत नाही.
पण ती बाई म्हणजे एखाद्या ऐस पैस तामिळी मंगाई सारखी! तिथूनच आली असेल इथं. साहावार इरकली लुगडं नेसून बोरमाळा आणि चित्ताक लेवून आलेली, भेळेच्या भडंगाइतकाच तिचा भडकदार अवतार. कपाळाला, डोक्याच्या जटांना टेकणारं लालभडक कुंकू आणि त्याच हलक्या हातानं ती मिरचीच्या सात पिढ्यांचा उद्धार करणारी भगवती भेळेत कालवून देत होती. माझ्यासाठी वरून खारवलेल्या आमसुलाचा त्या लाल जाळात मुरलेला एक तुकडा तीनं टाकला. एखाद्या केकवरच्या चेरीच्या तोंडात मारेल अशा थाटात तिने भेळेवर शेंगदाणे लावले आणि माझ्या हातात भेळ सुपुर्द केली. आहाहा... मला ओठ कातरायची सवय आहे, त्यावर हा भेळेचा बोकणा मरल्यावर मला, आग-आग आणि सूख-सूख एकदम झालं. बहुतेक आम्हाला असंच शिकवतात लाहानपणापासून म्हणून असेल. 
समोर हिरवं, काळ्यातनं दूधी वाहतय, तांबड्या इंजिनची-निळी ट्रेन आणि हातात भेळ, सगल्याचीच भेळ ! भेळेतला शेंगदाणा हा अलिकडच्या काळात तसा ज़रा दुर्लक्षिला गेलेला एलिमेंट आहे हे ज़ाणवलं. म्हणजे परवा मी पुण्यात मॉडर्न कॉलेज ज़वळ पांडूरंग भेळ म्हणून भेळ खाल्ली एकदम अव्वल करणावळ अगदी रंकाळ्याची आठवण झाली; तर त्या भेळेत सुद्धा टपोऱ्या शेंगदाण्यांचा भरघोस वाटा होता. मग ह्या साऱ्यावर गौड सारंग काफ़ी थाटात असावा की कल्याण थाटात असावा, का त्याला अगदी गौड कल्याण असं नांव देऊन त्यात असलेल्या किंवा नसलेल्या तुटपुंज्या सारंगाची हकालपट्टी करावी या गहन गंभीर विषयासारखीच भेळेतला शेंगदाणा ह्यावर पाक-विशारदांची कॉंन्फ़रन्स का होऊ नये? असा विचार आलाच.
नाही म्हटलं तरी तसं खाताना दुसरं कांही सुचणं अवघडच आहे म्हणा, पण गाताना गाणारे माघारी चर्चा करतात मग भरल्या पोटी ढेकर देत हिंग-मीरिच्या भपकाऱ्याबरोबर एकदोन स्टेट्मेंट्स करायला कांहीच हरकत नाही. बाकी पाक-विशारद हे ही "पोचलेल” असावेत. म्हणजे खादाड-खाबू नव्हेत तर, रातातुई मधल्या इगॉर सारखे केवळ निर्मम...! खाण्याला "सिरीयस जॉब" मानणारे. खाण्यासाठी खाणारे ढीग भेटतात. पूर्वीच्या आजी कॅटेगरीतल्या बायकांचे पेप्-टॉक्स त्यामानानं पाक-विषयांना धार्जिणे असायचे, आताच्या अज्ज्या म्हणजे अगदीच सीरीयल कूक किंवा मेजवानी वाल्या. पूर्वी आजी लोक बोलणार म्हणजे, दोन-दोन, तीन-तीन फ़ोडणीचे पदार्थ त्यांच्या-त्यांच्या आया-सासवान्नी कसे करू घातले आणि त्या कशा तयार झाल्या किंवा "आमच्या लहानपणी आप्पे किंवा फ़ड्ड नारळाच्या दुधातून कसे खायचे वर्सेस त्या अप्प्याच्या आंबवणात तुपावर परतून गूळ-खोबरं टाकूनच ते कसे बनवायचे" आणि आता (मेल्या) उडप्यांच्या हातचं खाऊन हे जुनं खाणं कसं विसरलेत लोक ह्याच्या खमंग चर्चा व्हायच्या. अरेरे... पण ज़ाणार हे सगळं. 




© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “Jagane.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.




No comments:

Post a Comment